काँग्रेसचे नेते सचिन पायलट लवकरच भाजपामध्ये येणार

128

जयपूर, दि. १० (पीसीबी) – उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिला. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे जितिन प्रसाद यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तर पंजाबमध्ये देखील काँग्रेस आमदार चालू सरकार पाडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस उत्तर प्रदेशात आधीच अडचणीत असतानाच आता काँग्रेसच्या समस्यांमध्ये आणखी एक भर पडली आहे.

राजस्थानचे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्षश्रेष्ठींना अल्टिमेटम दिला आहे. जुलैपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय नियुक्त्या करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेण्यास आम्ही स्वतंत्र आहोत, असा अल्टिमेटम त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना दिला आहे. गेले दोन दिवस राजस्थानात सत्तांतर होण्याच्या चर्चेला वेग आला आहे. त्याचबरोबर बैठकांचं सत्र चालू झालं आहे.

सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे, असा दावा नुकत्याच भाजपत प्रवेश केलेल्या रिटा बहुगुणा जोशींनी केला आहे. त्यानंतर मात्र दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या झोपी उडाल्या आहेत. राहुल गांधींचे निकटवर्तीय हळूहळू पक्ष सोडून जात असल्यानं आता काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी होताना पाहायला मिळत आहेत. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू झाला आहे. पंजाब राज्य हातातून जाण्याआधी काँग्रेस हायकमांडने हालचाली सुरू केल्या आहेत.

WhatsAppShare