काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

109

नवी दिल्ली, दि.१५ (पीसीबी) : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने आज या बाबत अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, शरद रणपिसे यांच्या निधानाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेसमधून अनेक जण स्पर्धेत होते. काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांचेही नाव विधान परिषदेच्या स्पर्धेत होते. मात्र, काँग्रेसने दिलेला शब्द पाळत प्रज्ञा सातव यांना उमदेवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यता आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. राहुल गांधी प्रत्येक निर्णय घेताना राजीव सातव यांच्याशी चर्चा करायचे. या दोन्ही नेत्यांची चांगली मैत्री होती. त्यामुळेही प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

WhatsAppShare