काँग्रेसची ईव्हीएमवर शंका म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ – चंद्रकांत पाटील

92

सांगली, दि. ४ (पीसीबी) – सांगली आणि जळगाव  महापालिका निवडणुकीत जनतेने काँग्रेसला  नाकारल्याचे दिसून आले आहे. मात्र, काँग्रेसने ईव्हीएमवर शंका घेतली आहे. हा प्रकार म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा आहे, असा खोचक टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला  लगावला . जळगाव आणि सांगली  महापालिकांमध्ये  भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.  

यावेळी चंद्रकांतदादा म्हणाले की, सरकारने बळाचा वापर केला, पैसे वाटण्यात आम्ही कमी पडलो, ईव्हीएममध्ये घोळ आहे,  असा आरोप  काँग्रेसने केला आहे. हे आरोप आता हास्यास्पद वाटू लागले आहेत, असे ते म्हणाले. इतर पक्षातील लोकांचे भाजपमध्ये इनकमिंग केले, असे  विचारले असता त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. पत्रकार कंपन्या बदलत नाही का? त्यात काही गैर असते का? मग आम्ही चांगली माणसे हेरली तर त्यात गैर काय? चांगली माणसे जोडणे हे उत्तम संघटकाचे कौशल्य आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले.

विरोधकांनी सगळीकडे भाजपविरोधी वातावरण आहे, असा आभास तयार केला. मात्र, जनता आमच्या सोबत असल्याचे निकालावरून दिसून आले आहे. सरकार आपले काम वेगळ्या पद्धतीने करत असून भाजपवर लोकांचा अजूनही विश्वास आहे.  लोकसभेची पोटनिवडणूक असो किंवा नगरपालिकेची भाजप हरणार असा कांगावा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरू केला आहे. मात्र, ते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो, अशी कितीतरी उदाहरणे आहेत, असेही चंद्रकांतदादा म्हणाले.