काँग्रेस महाआघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या मूड मध्ये

144

नागपूर, दि. १६ (पीसीबी) : भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. राष्ट्रवादीने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी केला. त्यानंतर अजित पवारांनी देखील पटोलेंना उत्तर दिले. आता हा वाद टोकाला पोहोचण्याची शक्यता असून काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोलेंनी काँग्रेस हायकमांडकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे. दरम्यान, आजवर काँग्रेसला ज्या पद्धतीने दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली ती पाहता काँँग्रेस आता महाआघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या मूड मध्ये असल्याचे राजकिय सुत्रांनी सांगितले.

काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातून नाना पटोलेंनी हजेरी लावली होती. यावेळी काँग्रेस हायकमांड राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे. पण, राष्ट्रवादीची भूमिका नेहमी भाजपच्या बाजूने असते. राष्ट्रवादीकडून नेहमी सोनिया गांधींचा अपमान केला जातो. ज्या उद्देशाने महाविकास आघाडी स्थापन झाली त्या विचाराला तिलांजली देण्याचं काम राष्ट्रवादी कडून होत आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. याबाबत काँग्रेस हायकमांड लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलं. ते साम टीव्हीसोबत बोलत होते.
भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीने पाठित खंजीर खुपसला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला होता. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. पण, राष्ट्रवादी नेहमी भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. त्यानंतर अजित पवारांनी देखील पटोलेंना प्रत्युत्तर दिले होते. ”प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. जिल्हास्तरावरील निर्णय तेथील नेते घेतात. नाना पटोले कोणत्या पक्षातून आले आहेत. त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा आमच्या पाठित खंजीर खुपसला असं भाजपने म्हणावं का? नाना पटोलेंची पार्श्वभूमी माहिती आहे”, असं अजित पवार म्हणाले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक वार सुरू आहेत.