“कष्टकर्‍यांचा सन्मान करणे ही भारतीय संस्कृती!” – सुनीता पाटसकर

54

पिंपरी,दि.१६ (पीसीबी) “कष्टकरी कामगारांचा सन्मान करून त्यांच्या कामाचे कौतुक करणे ही भारतीय संस्कृती आहे!” असे विचार ग्रीन वर्ल्ड क्लब (पिंपरी-चिंचवड) अध्यक्ष सुनीता पाटसकर यांनी पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीतील जे ब्लॉक येथे रविवार, दिनांक १५ मे २०२२ रोजी व्यक्त केले. धर्मवीर संभाजीमहाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रीन वर्ल्ड क्लबच्या वतीने सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, चालक, महिला कर्मचारी अशा सुमारे अकरा कष्टकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानचिन्ह आणि मिठाई, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पाच महिलांचा समावेश होता.

यावेळी क्लबचे संस्थापक-अध्यक्ष गौतम कोतवाल म्हणाले की, “मानवसेवा हीच ईश्वसेवा मानून ग्रीन वर्ल्ड क्लब वीस वर्षांपासून समाजातील प्रामाणिक आणि कर्तृत्ववान लोकांना समाजापुढे आणून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. यामध्ये प्रामुख्याने एक हजार उद्योजकांच्या यशोगाथा तरुणांना प्रेरणा देण्यासाठी पुस्तकरूपाने प्रकाशित करून दोनशेहून अधिक उद्योजकांचा सन्मान विविध पुरस्कार प्रदान करून यापूर्वी करण्यात आला आहे. धर्मवीर संभाजीराजे हे आपल्या संपूर्ण रयतेला सन्मानाची आणि आदराची वागणूक देत असत!” ज्येष्ठ कामगार नेते मधुकर मडके याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून, “कामात प्रामाणिकता असेल तर कष्टाचे फळ मिळते आणि गरिबी आपोआप दूर जाते. ग्रीन वर्ल्ड क्लबचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. उद्योजक विनीत मोरे यांनी सन्मानार्थींचे आणि प्रमुख अतिथींचे आभार मानले. प्रियंका सागरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.