कष्टकरी असंघटीत कामगारांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार – आमदार लांडगे

109

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – कष्टकरी आणि असंघटित कामगारांचे प्रश्न व समस्या शासकीय स्तरावर सोडवण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले.

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने चिंचवड येथे आयोजित असंघटीत कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते होते. यावेळी नगरसेवक तुषार हिंगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, उद्योजक कार्तिक लांडगे, स्वीकृत सदस्य जितेंद्र पवार, डॉ गणेश अंबिके, आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. संकेत जैन, सूरज भंडारे, डॉ. सरोज अंबिके आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले, “शहरात मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार असून शहर विकासात त्यांचा मोठा हातभार आहे. या असंघटित कामगारांचे प्रश्न आरोग्य , सुरक्षा, वेतन आदी मुद्दे घेउन येत्या अधिवेशनात प्रश्न मांडणार आहे.”

काशिनाथ नखाते म्हणाले, “केंद्र सरकारने २००८ मध्ये सामाजिक सुरक्षा कायदा केला. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारवर सोपवली. निधीच्या कमतरतेमुळे हा कायदा आजपर्यंत अंमलात आणला गेला नाही. असंघटित कामगारांचे प्रश्न गंभीर असून कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा साधने नसल्याने अनेक अपघाती मृत्यू होत आहेत. असंघटितांसाठी मुख्यमंत्र्यानी मागील अर्थसंकल्पात तरतूद केली. मात्र ती कागदावरच राहिली. किमान पिंपरी-चिंचवड महापालिकेने तरी घरकुल योजनेत असंघटित कामगारांसाठी घरे राखीव ठेवावीत, अशी मागणी त्यांनी केली.”

यावेळी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल व मोरया सामाजिक प्रतिष्ठानच्या सहकार्याने कष्टकरी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ३६० महिलांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात कामगारांना शासकीय ओळखपत्रांचे व १ लाख रुपयांच्या मोफत विमा प्रमाणपत्रांचे वाटप आमदार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्यासाठी राजू बिराजदार, अनिल बारवकर, प्रकाश साळवे, साइनाथ खन्दीझोड, सुरेश देडे, मनीषा राउत, माधुरी जलमुल्वार, धर्मेन्द्र पवार, तुकाराम माने, राजू जाधव, किशोर इंगळे, सुलोचना मिरपगारे, किरण सादेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय तरटे यांनी केले. मधुकर वाघ यांनी आभार मानले.