कशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान मोदी

95

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – जीवन कसे असावे, ते कसे जगावे, का जगावे आणि कशासाठी जगावं याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी होते. ते जनसामान्यांसाठी जीवन जगले.. ते देशासाठी, देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शक होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहिली. 

दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मोदी बोलत होते.

ते म्हणाले, दहा वर्षांपासून अटलजी कोणत्याही राजकीय मंचावर आले नव्हते. तरीही लोक त्यांना विसरले नाहीत, त्यांच्या अंत्ययात्रेला लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. अटलजींची जादू होती ती हीच. येणाऱ्या पिढ्याही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत. संसदीय परंपरेचा गौरवगान करताना ते जनसामान्यांचा आवाज म्हणून जगले. जेव्हा संधी मिळाली तेव्हा सर्वसामान्यांसाठी त्याचा उपयोग केला. ते नावानेच अटल नव्हते तर त्यांच्या वर्तणुकीत, त्यांच्या कणाकणात अटलभाव दिसून येतो.

पोखरणमधील अणुचाचणी संपूर्ण जगाला धक्का देणारी होती. दशकांपासून त्याची तयारी सुरू होती. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. ११ मे ला पहिली अणूचाचणी झाल्यानंतर जगभरातून दबाव निर्माण झाला. त्याला न जुमानता त्यांनी पुन्हा १३ मे रोजी दुसरी अणुचाचणी करत जगाला उत्तर दिले. यातून त्यांचा निग्रह दिसून येतो.