कवयित्री प्रा.डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांचे निधन

16

पिंपरी, दि. ३०( पीसीबी) ज्येष्ठ कवयित्री प्रा.डॉ. भाग्यश्री कुलकर्णी (वय ५४ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी (दि.२९) निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या पश्चात पती भालचंद्र कुलकर्णी, मुलगी मधुरा कुलकर्णी आणि सासूबाई प्रभावती कुलकर्णी असा परिवार आहे.

भाग्यश्री कुलकर्णी यांना आपल्या वडिलांकडून कवितालेखनाचा वारसा मिळालेला होता. बालपणी वडील विजय कुलकर्णी यांच्यासोबत त्यांचा ‘विजयगिरी’ हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला होता. त्यानंतर ‘बुटक्यांचा देश’ हा बालकवितासंग्रह तसेच अनेक दिवाळी अंक आणि नियतकालिकांमधून त्यांचे कविता, कथा, ललितलेखन प्रसिद्ध झालेले आहे. पिंपरी-चिंचवडमधील विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये सुमारे पंचवीस-तीस वर्षांपासून त्यांचा नियमित सहभाग होता. व्यासंग, उत्तम प्रतिभा आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या प्रा.डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पिंपरी-चिंचवड साहित्य क्षेत्रावर दु:खाची शोककळा पसरली आहे.

WhatsAppShare