कळमनुरीचे आमदार डॉ. संतोष टारफे यांची कार अज्ञातांनी जाळली

190

हिंगोली, दि. २६ (पीसीबी) – हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार डॉ. संतोष टारफे यांची इनोव्हा कार  बुधवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास  अज्ञातांनी जाळल्याची घटना समोर आली आहे. शेजारी असलेल्या नागरीकांनी ही बाब डॉ. टारफे यांना कळविल्यानंतर गाडी विझविण्यात आली. यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरीचे आमदार डॉ. टारफे यांचे हिंगोली शहरातील नाईक नगर भागात निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानासमोर बुधवारी रात्री त्यांची इनोव्हा गाडी उभी करण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाळ दिसू लागल्याने शेजारील नागरीकांनी सांगितल्यानंतर डॉ. टारफे यांच्यासह इतरांनी धावपळ करून गाडीवर पाणी टाकून आग विझविली. या आगीमध्ये वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. डॉ. टारफे यांच्या निवासस्थानासमोर सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. या सिसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.