कर्नाटकात ‘कमळ’ फुलणार? राजीनामा दिलेले आमदार मुंबईतील हॉटेलात दाखल

129

मुंबई, दि ७ (पीसीबी) – कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या असून काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यापैकी ११ आमदारांची मुंबईतील एका आलिशान हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून काँग्रेस त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस-जेडीएस सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्य १३ आमदारांनी शनिवारी राजीनामा दिल्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे. कर्नाटक सरकार कोसळणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. कुमारस्वामी देशात नसल्यामुळे सर्व आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे अजून ५-६ आमदार सोमवारी राजीनामा देतील असे सुतोवाच माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडियुरप्पा यांनी केले आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन झाल्यापासूनच भाजप सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करते आहे. काँग्रेस-जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे २२४ आमदार असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएसकडे केवळ १०५ आमदार उरले आहेत तर भाजपचेही १०५ आमदारच आहे. या १३ही आमदारांनी राजीनामा मागे न घेतल्यास सरकार अल्पमतात जाण्याची चिन्हं आहेत. मंगळवारी विधानसभेत या आमदारांच्या राजीनाम्यावर विचार करण्यात येणार असून त्यानंतर काँग्रेस-जेडीएस सरकार राहणार की कोसळणार हे निश्चित होणार आहे. या १३ही आमदारांचे मन वळवण्यासाठी काँग्रेस जंग जंग पछाडतं आहे. यातील ११ आमदारांची मुंबईतील एका आलिशान हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कर्नाटक काँग्रेस अध्यक्ष के. के. वेणुगोपाल आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या या सर्व आमदारांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसंच राज्यातील विद्यमान मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडून नाराज आमदारांना मंत्रिपदाची ऑफरही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. इतर कोणत्याही आमदारांनी राजीनामा देऊ नये असं आवाहन सिद्धरमैय्या यांनी केलं आहे.