कर्नाटकातील काँग्रेसचे ९ आमदार सिद्धरामय्यांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

73

बेंगळुरू, दि. २७ (पीसीबी) – कर्नाटकातील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातून काँग्रेसचे ९ आमदार  नाराज असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेण्यासाठी बेलतानगगिरी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धरामय्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कामगिरीवर नाराज आहेत. यामुळे जेडीएसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तर  काँग्रेसच्या नेत्यांमध्येही असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

सिद्धरामय्या हे जेडीएस-काँग्रेसच्या युतीच्या समन्वय समितीचे अध्यक्षही आहेत. सिद्धरामय्या सध्या पूर्णतः सुटीवर असून ते कोणाचा फोनही घेत नाहीत. तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांची आपले विश्वासून सहकारी एस. टी. सोमशेखर, बी. सुरेश आणि एन. मुनिरत्न यांच्याशी सातत्याने संपर्कात आहेत.

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार आपल्या मंत्री आणि आमदारांच्या नाराजीमुळे अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांकडून चर्चेचे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. दरम्यान, काँग्रेसचे बहुतांश नाराज नेते सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.