कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं पिंपरी-चिंचवडशी आहे ‘हे’ जवळचे नातं

155

कर्नाटक, दि.२८ (पीसीबी) : कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची बसवराज बोम्मई यांनी आज सकाळी शपथ घेतली. बोम्मई यांचे औद्योगिकनगरी पिंपरी- चिंचवडशी असलेले जवळचे नाते समोर आले आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या बोम्मई यांनी आपल्या करिअरची सुरूवात पिंपरी-चिंचवडमधून केली होती. टाटा मोटर्स कंपनीच्या ‘एडीडी’ डिपार्टमेंटमध्ये त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर उद्योग आणि पुढे राजकारणात प्रवेश केला आणि आज कर्नाटकाचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे.

“कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सन 1982 मध्ये पिंपरीतील टाटा मोटर्सच्या प्लँटमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कंपनीच्या अनक्लयुरी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट (एडीडी) मध्ये रुजू झाले होते. तीन वर्षे त्यांनी नोकरी केली. तीन वर्षांनंतर त्यांनी नोकरी सोडली”, असे टाटा मोटर्सचेे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर यांनी ‘एमपीसी न्यूज’या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

बोम्मई यांचा जन्म हुबळीमधील असून ते 61 वर्षांचे आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बोम्मई यांनी पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्स कंपनीत तीन वर्षे नोकरी केली आहे.त्यानंतर त्यांनी उद्योग क्षेत्रातही नशीब अजमावले होते. त्यांचे वडील एस. आर. बोम्मई हेही मुख्यमंत्री होते. त्यामुळे राजकारणाचा वारसा घरातूनच आहे. जनता दलातून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरूवात केली. 1997 आणि 2003 अशा दोनवेळी ते विधानपरिषदेत आमदार म्हणून गेले. 2008 मध्ये त्यांनी जनता दलाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये गेल्यानंतर विधानसभेवर ते निवडून आले. 2013 आणि 2018 मध्येही ते विजयी झाले. मावळते मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात बोम्मई यांच्याकडे महत्वाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. वयाचे कारण देत येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे.

WhatsAppShare