कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या लगावली कानशिलात

395

 देहूगाव, दि. १३ (पीसीबी) – नियंत्रण कक्षातून आलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस एका मदतीच्या कॉलवर देहूगाव येथे गेले. तिथे एक व्यक्ती त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. ते भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्या व्यक्तीने अरेरावी करत एका पोलिसाच्या कानशिलात लगावली. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री सव्वाआठ वाजता माळवाडी, देहूगाव येथे घडली.

मारुती दिनकर मुंडे (वय 35, रा. माळवाडी, देहूगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक गोरखे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत मार्शल ड्युटीवर होते. रात्री सव्वाआठ वाजता त्यांना पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षातून एक कॉल आला. माळवाडी देहूगाव येथे मदतीसाठी जाण्याच्या सूचना त्यांना कॉलवर मिळाल्या.

त्यानुसार फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल गोरखे आणि पोलीस नाईक कोंडलकर हे माळवाडी देहूगाव येथे गेले. त्यावेळी आरोपी मारुती मुंडे हा त्याच्या पत्नीला झाडाच्या फांदीने मारहाण करत होता. त्याबाबत त्याला फिर्यादी यांनी विचारपूस केली असता त्याने ‘तू कोण विचारणार मला’ असे म्हणून दगड घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी धावून आला. पोलीस नाईक कोंडलकर यांनी आरोपीला पकडले असता आरोपीने फिर्यादी यांच्या कानशिलात मारून त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करून मारुती मुंडे याला अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.