कर्जमाफी मिळत नसल्याने दाम्पत्याची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

154

बुलढाणा, दि. ७ (पीसीबी) – कर्जमाफी मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील शेतकरी दाम्पत्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास घडली.

रमेश सावळे आणि विद्या सावळे असे या दाम्पत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोताळा येथे राहणारे शेतकरी रमेश सावळे आणि विद्या सावळे यांची ३ एकर शेती आहे. त्यावर बँकेचे कर्ज होते. राज्य सरकारकडून कर्जमाफी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ सावळे दाम्पत्याला मिळाला नव्हता. त्यांचे कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांचा यादीत नावही होते. मात्र, कर्जमाफी झाली नव्हती. बँकेचे कर्ज डोक्यावर असल्याने ते दाम्पत्य तणावात होते. कर्जमाफी नाही आणि त्यामुळे नव्याने कर्जही मिळत नव्हते. या विवंचनेतून गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सावळे दाम्पत्याने घराशेजारील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.  दरम्यान, या दाम्पत्याला एक तीन वर्षांचा मुलगा आहे.