“कर्जत जामखेडकरांचं काम म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं. तुम्ही आमची जिरवली आणि..” ; राम शिंदेची रोहित पवारांवर जहरी टीका

204

अहमदनगर, दि.२१ (पीसीबी) : कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय. कुणाला सांगताही येईना, बोलताही येईना, अशा शब्दात माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय. सगळ्यांचे चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारच बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय, अशी फटकेबाजी राम शिंदे यांनी केलीय. शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता, माझी तर जिरलीच, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात, आमचीही जिरली साहेब आता, अशी टोलेबाजी शिंदेंनी या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे पाटील देखील उपस्थित होतेय.

रोहित पवार बारामतीचे असूनही कर्जत जामखेडमधून लढले आणि कर्जत-जामखेडकरांच्या आशीर्वादाने आमदार झाले. बाहेरुन येऊनही रोहित पवारांनी राम शिंदेंना हरवलं. याचं शल्य राम शिंदेंच्या मनात अजूनही जाणवतं. अधून मधून एखाद्या जाहीर कार्यक्रमांतून ते आपली खंत बोलून दाखवत असतात. जामखेडच्या एका कार्यक्रमात त्यांनी खंत बोलून दाखवताना जोरदार फटकेबाजी केली.

“आता कसं वाटतंय… मोक्कार बरं वाटतंय की नाही… पण आता काय करणार… सांगताही येईना बोलतानाही येईना… कर्जत जामखेडकरांचं काम म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं झालंय… सांगता कुणाला… बोलता कुणाला… तुम्ही आमची जिरवली… आता त्यांनी तुमची जिरवली…”, अशा शब्दातून त्यांनी रोहित पवारांवर टीका केली तर तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावर उपस्थितांमध्ये मिनिटा-मिनिटाला खसखस पिकत होती.

त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुजय विखे ही मोठ्या मनाची माणसं आहेत. कामं मंजुर करतात आणि शरद पवारांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आग्रह धरतात. आम्ही प्रयत्न केला आमच्या काळात प्रस्ताव गेले, खासदारांच्या काळात मंजूर झाले पण उपस्थिती शरद पवारांना लावायला लावतात कारण की नातवाला थोडीफार संधी मिळावी. नाहीतर पारच उचलून टाकल्यावानी होईन, अशी टोलेबाजी करुन राम शिंदेंनी सभा जिंकली.

WhatsAppShare