कर्जत कारागृहातून पळालेल्या दोन्ही आरोपींना वडगाव पोलिसांनी केले जेरबंद

89

मावळ, दि.१३ (पीसीबी) – कर्जत कारागृहातून पळालेल्या सराईत गुन्हेगारांना वडगावमध्ये सापळा रचून ५ आरोपींपैकी दोघांना वडगाव मावळ पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले. पकडलेल्या दोन्ही आरोपींना नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले.

मोहन कुंडलिक भोरे (वय ३६ रा.कवडगाव, ता.जामखेड, जि.अहमदनगर), ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (वय.२५, रा.जवळा, ता.जामखेड जि.अहमदनगर) अशी या आरोपींची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाण्याच्या कारागृहात सन २०१८ पासून कैदेत होते. त्यांच्यावर खून, बलात्कार, जबरी चोरी, लुटमार अशी गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.एकाच कोठडीत असलेल्या या पाच आरोपींनी ८ फेब्रुवारीला छताला असलेले प्लायवुड व त्यावरील गज कुठल्या तरी हत्याराने कापून  छतावरील कौल काढून पलायन केले होते. यापैकी आरोपी मोहन भोरे हा त्याचा साथीदार ज्ञानेश्वर कोल्हे दोन्ही आरोपी वडगाव मावळ येथील म्हाळसकर वाडीतील लोटस् संकुलामध्ये राहत असलेला त्याचा भाऊ परमेश्वर भोरे यांच्याकडे येणार असल्याची माहिती सुत्रधारांकडून पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक निंबाळकर यांच्यासह संबंधित पथकाने मंगळवारी रात्री सातच्या सुमारास बिल्डिंग परिसरात सापळा रचला असताना आरोपी भोर हा घरातून जिन्यातून येत असल्याचे दिसताच त्याला ताब्यात घेतले. दरम्यान दुसरा आरोपी कोल्हे हा पळून गेला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तो टेरेसवर टाकीजवळ लपून बसलेला आढळला. या दोन्ही आरोपी भोर आणि कोल्हे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दुचाकी ( क्र. एमएच ४२ ए ७८६९) हस्तगत करून आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना नगर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले.

पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्यासह त्यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक दिलीक देसाई, सहाय्यक फौजदार कविराज पाटोळे, पोलिस हेडकॉन्टेबल मनोज कदम, विश्वास आंबेकर, श्रीशैली कंटोळी, राजेंद्र राय, प्रवीण विरणक, संदिप घोटकर, अमोल तावरे, गणेश तावरे यांनी वडगाव मावळ म्हाळसकर वाडी परिसरात सापळा रचून पाठलाग करून त्यांना पकडले.