कधी पंढरपूरला गेलो; तर फार लोकांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचे दर्शन घेतो- शरद पवार

31

पुणे, दि. ९ (पीसीबी) – ‘मी वारीमध्ये जात नाही; पण त्याबद्दल अनादर केला नाही. कधी पंढरपूरच्या दिशेला गेलो, तर फार लोकांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचे दर्शन घेतो. मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय पूजा चुकविली नाही.’ अशा भावना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्र सेवा दल प्रकाशित आणि हभप श्यामसुंदर सोन्नर लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात करण्यात आले. या वेळी देहू फडाचे प्रमुख बापूसाहेब देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश परांजपे, कार्याध्यक्ष शरद कदम, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘मी वारीपासून बाजूला असतो, असे बोलले जाते. मला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर केलेले आवडत नाही. कधी पंढरपूरच्या बाजूला गेलो, तर फार लोकांना बरोबर न घेता गुपचूप पांडुरंगाचे दर्शन घेतो. त्याचे फोटो प्रसिद्ध व्हावेत, अशी माझी इच्छा नसते. राज्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्या वेळी एकदाही पांडुरंगाची शासकीय पूजा माझ्याकडून चुकविली गेली नाही.’