कडी कोयंडा उचकटून चोरटयांनी दुकानात केला प्रवेश; चोरून नेले…

1

बोपखेल,दि.०५(पीसीबी) – किराणा मालाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी किराणा मालासह इतर साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 31 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 4) पहाटे पाच वाजता बोपखेल गावठाण येथील रतन प्रोव्हिजन स्टोअर येथे उघडकीस आली.

रतनलाल सुंदरलाल अगरवाल (वय 56, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अगरवाल यांचे बोपखेल गावठाण येथे मारुती मंदिरासमोर रत्न प्रोव्हिजन स्टोअर नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी रविवारी रात्री आठ वाजता दुकान कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून दुकानात प्रवेश केला.

अज्ञात चोरट्यांनी दुकानातून किराणा माल, इतर साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 31 हजार 10 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी पहाटे सव्वापाच वाजता हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare