कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल ; कल्याण आणि बेळगाव मधील सिनेमागृहात बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट

158

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल तसेच कल्याण आणि बेळगाव मधील सिनेमागृहात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता, अशी माहिती राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने  मुंबई सत्र न्यायालयात आज (मंगळवार) दिली.

एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारासह राज्याच्या अन्य भागातून स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त केला होता. या प्रकरणी अटक झालेल्यांचे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगरकर या आरोपींना आज विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

एटीएसच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण माहिती दिली. कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा कल्याण आणि बेळगाव येथील सिनेमागृहात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता. तसेच पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्येही स्फोट घडवण्याचा आरोपींचा कट होता. हा फेस्टिव्हल हिंदू संस्कृतीच्या विरोधात असल्याचा आरोपींना वाटत होते, अशी माहिती एटीएसच्या वतीने न्यायालयात देण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.