कचरा टाकण्याच्या ठिकाणी केली वर्टिकल गार्डनची निर्मिती

65

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि टीम बेसिक्सच्या वतीने कचरा टाकण्याची ठिकाणे केली सुशोभित केली जात आहेत. पिंपळेसौदागर गावठाणातील विश्वशांती कॉलनी येथील कचरा टाकण्याच्या ठिकाण सुशोभित केले. तिथे टाकाऊ वस्तुपांसून वर्टिकल गार्डनची निर्मिती केली. विविध सूचना फलक लावले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला असून लोक या ठिकाणी येवून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे हा सेल्फी पॉईंट बनत आहे.

महापालिकेच्या ड कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव, प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागरचे आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण, रोहित चंदेल आणि बेसिक्स झोनल इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली टीम बेसिक्सच्या प्रतिनिधी यांनी हा उपक्रम राबविला. पिंपळेसौदागर गावठाणातील विश्वशांती कॉलनी येथे, सायली पार्क, एसएनबीपी शाळेसमोरील कचरा टाकण्याची ठिकाणी सुशोभित केली. वर्टिकल गार्डन करून सुशोभीकरण केले. त्याठिकाणी रांगोळी, कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. संदेश बोर्ड लावून सूचना देण्यात आल्या. मी या शहराचा सुजाण नागरिक, ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटा गाडीमध्येच टाकणार, येथे कचरा टाकू नये. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

लाईटची रोषणाई करण्यात आली. त्यामुळे तेथील सर्व परिसर विद्युत रोषणाईने उजळला. परिसरातील लोकांना चला स्वच्छग्रह मोहिमेला यशस्वी करूया आपले पिंपरी- चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवूया असे सांगण्यात आले. ज्या ठिकाणी चौका-चौकात लोक उघड्यावर कचरा टाकतात अशा ठिकाणी तेथील सौंदर्य वाढवण्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ अशा प्रकारांचे वर्टिकल गार्डन तयार केले. लोक कचरा टाकतात अशा ठिकाणी वर्टिकल गार्डन तयार करून हिरवाई दाखवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. बागेच्या भिंतीसारखे दिसते.

रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लोकांना फोटो सेल्फी घेता यावे यासाठी वर्टिकल गार्डन ठिकाणी बसण्याचे बाकडे बसविण्यात आले आहेत. प्रभागातील प्रमुख चौक असल्याने या हँगिंग गार्डनचे सौंदर्य वाढले आहे. शाळा-कॉलेजला येणारे तरुण असोत किंवा शहरातील रहिवासी असो, ते ही बाग बघत थांबत आहेत. क्षणभर विश्रांती घेत आहेत. तसेच तरुण-तरुणी सेल्फीही घेत आहेत.