कंपनीत पोहोचविण्यासाठी भरून दिलेल्या मालाचा ट्रक चालकाने केला अपहार

41

देहूगाव, दि. १३ (पीसीबी) – देहूगाव येथील कंपनीतून अंबरनाथ येथील कंपनीत पोहोचविण्यासाठी ट्रकमध्ये भरून दिलेल्या मालाचा आणि ट्रकमधील डिझेलचा चालकाने अपहार केला. त्यांनतर चालक ट्रक रस्त्यातच सोडून पळून गेला. ही घटना ९ मे रोजी विठ्ठलनगर देहूगाव येथे घडली.

सोहेल सरफराज खान (वय ३२, रा. उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विकास निवृत्ती सोळुंके (वय ४३, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विठ्ठलनगर देहूगाव येथील व्यंकटेश मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज या कंपनीतून अंबरनाथ एमआयडीसी मधील इंजिनमेंट्स हिट ट्रान्सफर या कंपनीत पोहोचविण्यासाठी ट्रकमध्ये चार हजार ९५५ किलो मटेरियल भरून दिले. तो माल अंबरनाथ येथील कंपनीत न पोहोचवता आरोपी चालकाने त्यातील दोन हजार ७४५ किलो मटेरियल आणि ट्रकमधील १४० लिटर डिझेलचा एकूण तीन लाख ६० हजार रुपयांचा परस्पर अपहार केला आणि ट्रक सोडून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.