कंपनीच्या नावे नवीन गाडी घेण्याच्या बहाण्याने तिघांची अडीच लाखांची फसवणूक

59

तळेगाव दाभाडे, दि. २२ (पीसीबी) – नवीन गाडी कंपनीच्या नावाने घ्यायची. त्यातून संबंधित कंपनी वाहन घेणा-यास दरमहा भाडे देईल, असे अमिश दाखवून आठ जणांनी मिळून तिघांकडून अडीच लाख रुपये घेतले. मात्र तिघांना गाडीचे भाडे, गाडी न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार जून 2020 ते 21 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मावळ तालुक्यातील अभिमान सोसायटी, शिरगाव येथे घडला आहे.

अमोल सुरेश जाधव, संस्कृती अमोल जाधव, संतोष बराठे, कुमार चंद्रकांत जाधव, गणेश लालासाहेब जाधव, प्रफुल्ल पांडे, अक्षय कांबळे, शरद जाधव (सर्व रा. शिरगाव, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश विश्वंभर कांबळे (वय 33, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नवीन गाडी कंपनीच्या नावे घेण्याचे अमिश दाखवून त्यापोटी फिर्यादी, त्यांचा भाऊ आणि पत्नीकडून तीन कार घेण्यासाठी अडीच लाख रुपये घेतले. त्या गाड्या फिर्यादी यांना आजवर न दाखवता दरमहा भाडे न देता, विश्वासाने कंपनीला गाड्यापोटी दिलेली मूळ रक्कम परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. आरोपींनी आणखी 500 ते 600 लोकांकडून अंदाजे 15 ते 20 कोटी रुपये अशा प्रकारे अमिश दाखवून घेत लोकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare