कंपनीचा बनावट लोगो वापरून नकली माल विकल्याप्रकरणी दोघांना अटक

94

रावेत, दि. १८ (पीसीबी) – हिन्दुस्तान युनिलिव्हर प्रा ली या कंपनीच्या नावाचा बनावट लोगो वापरून नकली सामान विकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई मुकाई चौकातील आयुष या दुकानात आणि डांगे चौकातील ऑरिक्स अॅक्वा या दुकानात करण्यात आली.

नारायण गुलाब पाटील (वय 28, रा. मुकाई चौक, देहूरोड), कौशल विष्णू चांदेरे (वय 18, रा. सुसगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राकेश राम सावंत (वय 37, रा. प्रभादेवी, मुंबई) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण याचे मुकाई चौकात आयुष इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. त्या दुकानात त्याने हिंदुस्थान युनिलिव्हर प्रा ली या कंपनीच्या नावाचा बनावट लोगो वापरून त्याआधारे आरओ मध्ये वापरले जाणारे जर्म किलर आणि अन्य नकली साहित्य ग्राहकांना विकले. पोलिसांनी दुकानाची पाहणी केली असता दुकानात एक लाख 48 हजार 750 रुपये किमतीचा नकली मुद्देमाल पोलिसांना आढळला. नारायण याला डांगे चौकातील ऑरिक्स अॅक्वा या दुकानदाराने हा माल दिला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करून त्यालाही अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गेज्जेवार तपास करीत आहेत.