कंत्राटाच्या वादातून ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्याला भोसकले

92

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) : इंटरनेटचे कंत्राट मिळवण्याच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला चाकुने भोसकले. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास इको ग्रीन सोसायटी जवळ वाकड येथे घडली. आरोपी देखील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे समर्थक असल्याचे समजते.

याप्रकरणी ३४ वर्षीय तरुणाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुमित मधुकर भूमकर (रा, भूमकरवस्ती, वाकड), प्रतिक लोखंडे (रा. नवी सांगवी) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत. मागील काही महिन्यनपासून इंटरनेटचे कंत्राट मिळवण्याच्या कारणावरून आरोपी आणि त्यांचा वाद सुरू होता. दरम्यान, २६ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपींनी फिर्यादी व त्यांचे भाऊ यांना जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्यावर हल्ला चढवला. आरोपी सुमित याने फिर्यादी यांना चाकुने भोसकले. तसेच, अन्य आरोपींनी त्यांना सिमेंटचा ब्लॉक व हातोड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.

WhatsAppShare