कंगनाचा ‘धाकड’ सिनेमा जोरदार आपटला

290

– भाजपाचे समर्थन नडले, देशभरात केवळ ८ तिकिटांची विक्री झाल्याने ४४२० रुपयांची कमाई

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : सतत भाजपाचे समर्थन करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत वर या शुक्रवारी नामुष्कीची वेळ ओढावली आहे. कंगनाचा ‘धाकड’ सिनेमा जोरदार आपटल्याचे चित्र देशभरात आहे. धाकड सिनेमाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी कमावलेला गल्ला अत्यंत कमी आहे. या शुक्रवारी देशभरात केवळ ८ तिकिटांची विक्री झाल्याने ४४२० रुपयांची कमाई झाली. पहिल्या दिवसापासूनच ‘धाकड’ची कामगिरी फारशी उल्लेखनीय राहिली नाही आहे. आतापर्यंत जेमतेम ३ कोटींचा गल्ला या सिनेमाने जमवला आहे. त्यामुळे कंगनाच्या फ्लॉप सिनेमांच्या यादीमध्ये आणखी एक सिनेमा जोडला गेला आहे. प्रेक्षकांना बॉलिवूडची क्वीन कंगनाच्या याही सिनेमाकडे पाठ फिरवली आहे.

शुक्रवारी पाच हजारांची रक्कमही पूर्णपणे या सिनेमाला कमावता आली नाही. बॉलिवूड हंगामाने याविषयी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा बॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाच्या निर्मितीसाठी मेकर्सनी ८० ते ९० कोटी रुपये एवढा पैसा खर्च केला आहे. या मीडिया अहवालानुसार, हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शिक करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश घई यांचे असून यामध्ये अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता, शाश्वत चॅटर्जी अशी स्टारकास्ट आहे. सिनेमाचे प्रमोशनही जोरदार झाले होते. पण प्रेक्षकांनी मात्र या सिनेमाकडे पाठ फिरवली आहे.