औरंगाबाद वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणी ३७ जणांना अटक; तर पंचनाम्यात तब्बल ६० कोटींचे नुकसान

138

औरंगाबाद, दि. १३ (पीसीबी) –  मराठा मोर्चाच्या ९ ऑगस्टच्या बंददरम्यान वाळूज एमआयडीसीत बंद कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडप्रकरणी जवळपास ५० कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून तब्बल ६० कोटीं पेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आता कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे धरपकड सुरु झाली आहे. वाळूज एमआयडीसीत विद्ध्वंस करणाऱ्या ५७ जणांना ताब्यात घेतले असून यातील ३७ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी झाल्यानंतर अटक झालेल्यांवर पोलिसांकडून कट कारस्थानाचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्योगांना संरक्षण देण्याची गरज आहे. कंपन्या फोडल्याने मोठे नुकसान झालय. आमच्या उद्योगांना संरक्षण मिळेल का, नसेल मिळणार तर आम्हालाही गुंतवणूक करण्यावर विचार करावा लागेल, असे उद्योजक संघटनेचे म्हणणे आहे. तर बंद दरम्यान कंपन्या बंद ठेवून देखील तोडफोड झाल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याची भावना उद्योजकांनी व्यक्त केली आहे.