औरंगाबादच्या उपमहापौरांचा वाजपेयींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी

108

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – औरंगाबाद महापालिकेच्या उपमहापौर विजय औताडे यांनी चक्क दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी घेण्याचा आचरटपणा केला आहे. ही दृश्य व्हायरल झाल्यामुळे विजय औताडे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात लोकांना सगळ्यात जास्त हौस असते ती सेल्फीची. तुम्ही फिरायला जा, एखाद्या कार्यक्रमात जा किंवा मग काम नसताना घरी बसलेले असा. ही सेल्फीची हौस आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. पण कधी आणि कुठे सेल्फी घ्यावी याचे भान प्रत्येकाला असायला हवे.

सेल्फी कुठे घ्यायचा आणि कुठे नाही, याचे तारतम्य सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी ठेवायला हवे, अशाही प्रतिक्रिया औरंगाबादकरांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे वाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना मारहाण करण्यात औताडे यांचा सहभाग होता. आणि आता दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिकलशासोबत सेल्फी घेण्याचा आचरटपणा केल्याचे समोर आले आहे. ही दृश्यं व्हायरल झाल्यामुळे औरंगाबादकर संतापले आहेत.