औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार – चंद्रकांत खैरे

69

औरंगाबाद,दि.१४(पीसीबी) – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लवकरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती दिली आहे.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कागदपत्रं मागवून घेतली आहेत. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का देणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्त वाहिनीवर बोलताना सांगितलं.

संभाजीनगरच्या मुद्द्यावर महापालिका निवडणूक जिंकू शकतो, असं वाटल्यामुळे मनसेने ही भूमिका उचलून धरली. परंतु सर्वांना माहित आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ नाव ठेवलं होतं. त्यामुळे त्याचं क्रेडीट कोणीही घेऊ नये, असंही चंद्रकांत खैरे यांनी सुनावलं

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यावर लगेच उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केली. दोन महिन्यांपासून कायदेशीर बाबी सुरु आहेत. लवकरच तुम्हाला औरंगाबादचं नामांतर झाल्याचं समजेल. हे शहर शिवसेनेचं आहे. १९९० मध्ये मी पहिला हिंदू आमदार झालो, तेव्हापासून एकदाही दंगल होऊ दिली नाही, असंही खैरे म्हणाले.