औद्योगिकनगरीत दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप   

76

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – मांगल्यपूर्ण आणि  भावपूर्ण वातावरणात  दीड दिवसांच्या  गणरायाला आज (मंगळवार) निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात  बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. 

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि एक-दोन-तीन-चार गणपतीचा जयजयकारच्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. शहरातील चिंचवड, पिंपरी, सांगवी येथे पवना नदीच्या घाटावर महापालिकेच्या वतीने गणरायाचे विसर्जन करण्यासाठी हौदांचा व्यवस्था करण्यात आली होती. निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र्य कुंडींची व्यवस्था करण्यात आली होती.

दीड दिवसांचा गणराया हा प्रामुख्याने घरगुती स्वरूपाचा असतो. अनेक कुटुंबांमध्ये दीड दिवस गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे. यानुसार  आज दुपारी नैवेद्य दाखवून आरती केल्यानंतर बाप्पांच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली. सोमवारी  मोठ्या उत्साहात स्वागत केलेल्या बाप्पाला  आज तितक्याच भक्तीभावाने निरोप देण्यात आला.