औंध येथील ‘एव्हीझेड स्पा अॅण्ड स्किन केअर मसाज सेंटर’ मधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; चार मुलींची सुटका

1460

पुणे, दि. ६ (पीसीबी) – औंध येथील ‘एव्हीझेड स्पा अॅण्ड स्किन केअर मसाज सेंटर’ मध्ये मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात सामाजिक सुरक्षा विभाग आणि चतु: श्रृंगी पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.५) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणाहून दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यातील ४ सज्ञान मुलींची सुटका केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अशुली लोहे (वय २७, रा. कोरेगाव पार्क, पुणे) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून औंध येथील ‘एव्हीझेड स्पा अॅण्ड स्किन केअर मसाज सेंटर’ मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी चतु: श्रृंगी पोलिसांची मदत घेऊन बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी पोलिसांना तेथे महाराष्ट्र आणि दिल्लीतील एकूण चार सज्ञान मुली अढळल्या. तसेच आरोपी अशुली लोहे हा त्यांच्याकडून वेश्यागमन करुन घेत असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. पोलिसांनी अशुली याला अटक करुन चारही मुलीची सुटका केली आहे.  पोलिसांनी घटना स्थळावरुन पाच हजारांची रोख  आणि चार मोबाईल जप्त केले आहेत.