ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून कार चालकास मारहाण..

152

वाकड, दि. १७ (पीसीबी) – कारला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून एका कार चालकाने दुस-या कार चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना 4 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास कस्पटे वस्ती, वाकड येथे घडली.

संतोष कल्याण भोसले (वय 43, रा. सुस रोड, पाषाण, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 16) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एम एच 14 / एस एस 0435) या कार वरील चालक स्वप्नील सुनील वैद्य (रा. कावेरी नगर, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे 4 डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास कस्पटे वस्ती, वाकड येथून आपल्या कार मधून चालले होते. त्यावेळी आरोपी स्वप्नील वैद्य हा पाठीमागून आला. ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून त्याने फिर्यादी भोसले यांच्या कारला त्याची कार आडवी लावली. भोसले यांना शिवीगाळ करून कानावर व छातीवर हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत भोसले यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली. पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र गिरनार तपास करीत आहेत.