ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणासंबंधी केंद्राने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

84

नवी दिल्ली, दि.०२ (पीसीबी) : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. एकूण 19 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय आता लांबणीवर टाकण्यात आला आहे. नवी तारीख कळेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर स्थगिती कायम राहणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. महत्वाची बाब म्हणजे अवघ्या चार दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता.

ओमिक्रॉन व्हायरसने रविवारपर्यंत अनेक देशांमध्ये हातयपाय पसरले आहेत. नेदरलँड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही हा जीवघेणा व्हायरस पोहोचला आहे. हा व्हायरस कोरोना व्हायरसपेक्षाही अधिक घातक आणि वेगाने पसरणारा असल्याने त्याला रोखण्यासाठी अनेक देशात कडक निर्बंध घालायला सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉन रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपायही सांगितले जात आहेत. त्यात विमानतळावर स्क्रिनिंग करण्यापासून ते जिनोम स्किवेन्सिंगपर्यंतच्या पर्यायांचा समावेश आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवावी की ठेवू नये यावर केंद्र सरकार विचार करत आहे. तसेच ज्या देशांमध्ये या नव्या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्या देशांची यादीही केंद्र सरकारने जारी केली आहे. त्या दक्षिण आफ्रिका, चीन, बोस्तवाना, यूके, ब्राझिल, इस्रायल, बांग्लादेश, मॉरिशस, न्यूझीलंड, जिम्बाब्वे, सिंगापूर आणि हाँगकाँगचाही समावेश आहे.

यूरोप आफ्रिकेसह जगाला धडकी भरवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिलावहिला फोटो आता समोर आलाय. इटलीतल्या विद्यापीठानं तो प्रसारीत केलाय. नवा विषाणू नेमका कसा दिसतो, तो शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात प्रवेश करतो, तो शरीरातले कोणते अवयव नष्ट करतो, त्याची लक्षणं कोणती हे सर्व अभ्यासण्यासाठी ह्या फोटोचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रासह देशावर आलेलं हे कोरोनाचं नवं संकट नेमक्या कोणत्या रुपात आहे हे कळायलाही फोटोमुळे मदत होतेय.

ओमिक्रॉनचा हा फोटो तसा धक्कादायक गोष्टी उघड करणारा आहे. बहुतांश म्युटेशन्स हे मानवी पेशींशी संवाद होणाऱ्या भागात सापडले आहेत. त्यामुळे शरीर त्यांना कसा प्रतिसाद देतं किंवा शरीराच्या इतर कुठल्या भागात कोरोनाचा हा विषाणू कसा प्रभाव टाकतं याचा अभ्यास अजून होणे बाकी आहे. पण ह्या फोटोमुळे त्याच्या अभ्यासाला चालना मिळेल हे नक्की. बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका, आणि हाँगकॉंगमध्ये जे ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत त्यांच्या अभ्यासाअंती हा फोटो तयार केला गेलाय.