ऑफिसला चप्पल आणि स्लीपर्स घालून येण्यास बंदी, ‘या’ शहरात महापालिकेचा नवा नियम

161

न्यूयॉर्क, दि. १३ (पीसीबी) – अमेरिकेतील कनेक्टीकट राज्यातील ग्रीनवीच शहरामधील महानगरपालिकेने कर्मचाऱ्यांनी स्लीपर्स तसेच चप्पल घालून ऑफिसला येऊ नये असे आदेश काढले आहेत. कर्मचाऱ्यांनी कामाला येताना अपघात होऊन ते जखमी होऊ नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ग्रीनवीच शहरातील महानगरपालिकेमध्ये मानवी संसाधन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मेरी पीपी यांनी या निर्णयाबद्दल अधिक माहिती दिली. ‘कामावर चप्पल किंवा स्लीपर्स घालून येऊ नये हा नियम १ जून पासून लागू करण्यता आला आहे. एखाद्या विशिष्ट घटनेवरुन हा निर्णय घेण्यात आला नसून कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा उद्देशाने हा नियम लागू केला आहे. चप्पल किंवा स्लीपर्समुळे अपघात होण्याची शक्यता असते. या अपघातांनंतर होणाऱ्या जखमा, या आजापणामुळे कर्मचाऱ्यांना घ्याव्या लागणाऱ्या सुट्ट्या, मेडीकल क्लेम हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे मेरी यांनी बोलताना सांगितले.

चप्पल आणि स्लीपर्स बंदी असली तरी काहीजणांना त्यांच्या कामाचे स्वरुप पाहता या नियमांमधून सूट देण्यात आली आहे. समुद्रकिनारी असणारे सुरक्षारक्षक, कॅप्स तसेच स्वीमींग पूल अधिकाऱ्यांना या नियमामधून वगळण्यात आले असून त्यांना कामाच्या ठिकाणी लगेच काढता येतील अशा स्लीपर्स आणि चप्पल वापरण्याची परवाणगी देण्यात आली आहे. चप्पल स्लीपर्सला परवाणगी नसली तरी पायाचा बराचसा भाग झाकणाऱ्या सॅण्डल्स घालून आल्यास काहीच हरकत नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे.