एसआरए योजनेत संमती घेण्यासाठी झोपडपट्टी धारकांना गुंडांकडून दमदाटीचे प्रकार सुरू

0

– जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांचे आयुक्तांकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात एसआरए अंतर्गत काही झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. कायद्यानुसार या योजनेसाठी सर्व झोपडी धारकांची संमती घेणे बंधनकारक आहे. काही राजकीय नेते, दलाल व बिल्डर हे झोपडपट्टी दादांच्या मदतीने अशा संमती पत्रासाठी झोपडीधारकांना सक्ती करतात तर काही ठिकाणी दमदाटीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. शहरातील प्रत्येक झोपडीधारकाला आहे त्या ठिकाणीच पक्के घर मिळाले पाहिजे, असे माझी स्पष्ट भूमिका आहे. मात्र त्यासाठी सक्ती किंवा दमदाटी होणार असेल तर ते कदापि खपवून घेतले जाणार नाही. महापालिका प्रशासन, एसआरए चे अधिकारी आणि पोलिसांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे केली आहे. जिथे कुठे संमती पत्र भरून घ्यायचे असेल त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन व संबंधीत पोलिस स्टेशनला कळविणे बंधनकारक करावे. त्याशिवाय अशा सर्वेक्षणासाठी पोलिसांचा बंदोबस्त पुरवावा, अशी सुचनाही सौ. सिमा सावळे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात ७५ अधिकृत आणि सुमारे ३० वर अनधिकृत झोपड्या आहेत. महापालिका, प्राधिकरण, एमआयडीसी तसेच खासगी जागेवर या झोपड्या आहेत. सुमारे तीन लाख लोक आपल्या कुटुंबकबिल्यासह गुण्यागोविंदाने तिथे राहतात. शहरात गेली ३०-४० वर्षांपासून या वसाहती आहेत. आता एसआरए मधून त्यांचे आहे त्या जागेवर पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे तर, काही मंजुरी मिळावी म्हणून रांगेत आहेत. प्रकल्पांना मंजुरी घेण्यासाठी संबंधीत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची लेखी संमती ही कायद्यानेच बंधनकारक आहे. ज्या विकसकाने अटींची व अन्य कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्यांनाच या कामासाठी संधी मिळते. आता अशा प्रकारे विविध झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे काम मिळावे यासाठी काही राजकीय लोक, जमीन दलाल, बिल्डर्स यांच्यात मोठी चढोओढ सुरू आहे, असे सिमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले.

झोपडीधारकाला संमती पत्र देताना कोऱ्या अर्जावर सह्या घेण्याची सक्ती असते. त्याशिवाय संबंधीत कुटुंबाला हा अर्ज कशासाठी भरून घेतला जातो त्याची पूर्ण कल्पना दिली जात नाही. नेमका विकसक कोण आहे, त्याचा पूर्वानुभव काय, त्याची पात्रता काय आहे, संक्रमण शिबिर कुठे असणार आहे, प्रकल्प कसा आहे, किती मोठे घर मिळणार, त्या घरांसाठी मेंटेनन्स कोण व किती देणार, घराचा ताबा केव्हा पर्यंत देणार आदी कोणताही तपशिल दिला जात नाही. कोणीतरी झोपडी दादा अथवा भाई येतो आणि संमती पत्रावर सही करण्याची सक्ती करतो. झोपडीधारक पात्र की अपात्र याची खातरजमा न करता सर्सास सह्या घेतल्या जातात. हे सार्वत्रिक चित्र अनेक झोपडपट्ट्यांतून पहायला मिळते. काही विकसक अत्यंत चांगले काम करत आहेत, पण जे चुकीच्या पध्दतीने गोरगरिबांना त्रास देतात त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, असेही सिमा सावळे यांनी स्पष्ट केले.

काही बरेवाईट होऊ नये म्हणून जिवाच्या भितीने सही करतात. खरे तर, प्रकल्पासाठी राजीखुशीने संमती घेतली पाहिजे. झोपडीधारकाला शाश्वती दिली पाहिजे. प्रत्यक्षात सुपारी गुंडच या साठी काम करत असल्याने लोक भयभित झाले आहेत. पोलिसांनी अशा लोकांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सिमा सावळे यांनी केली आहे.

संमती पत्रासाठी अशा प्रकारे कोणा झोपडीधारकाला दमदाटी, सक्ती केली गेली तर त्यांनी अगदी निर्धास्तपणे थेट पोलिसांकडे तक्रार दाखल करावी अथवा आपल्याला संपर्क करावा, असे आवाहन सिमा सावळे यांनी केले आहे.

WhatsAppShare