वस्तूंची विक्री एमआरपीपेक्षा जास्त किंमतीने केल्यास संबंधित विक्रेत्यांना चांगलेच महागात पडणार आहे. एमआरपीपेक्षा जास्त किंमतीने वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना ५ लाख रुपये दंड आणि दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव ग्राहक मंत्रालयाने तयार केला आहे.

एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेऊन वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात ग्राहकांची लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा विचार करण्यात आला. त्यानुसार एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना पाच लाख रुपये दंड आणि दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सध्या एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या विक्रेत्यांना एक लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा कायदा आहे. पहिल्यांदा गुन्हा घडल्यास २५ हजार रुपये दंड आणि तो जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत करण्यात येतो. दुसऱ्यांदा गुन्हा घडला तर ५० हजार रुपये दंड आणि तो अडीच लाखांपर्यंत वाढविला जातो. परंतु, ग्राहक मंत्रालयाने तयार केलेल्या नव्या प्रस्तावानुसार विक्रेत्यांकडून पहिल्यांदा गुन्हा घडल्यास १ लाख रुपये दंड आणि तो जास्तीत जास्त ५ लाखांपर्यंत वाढविण्याची तरतूद आहे. त्यामुळे वस्तूंची विक्री एमआरपीपेक्षा जास्त किंमतीने केल्यास विक्रेत्यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.