एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या कृतीने खासदार असदुद्दीन ओवेसी संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल

3345

औरंगाबाद, दि. २१ (पीसीबी) – औरंगाबाद महापालिकेचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन याने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला केलेल्या विरोधामुळे स्वतः पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी प्रचंड संपातले आहेत. त्याबाबतच्या फोन कॉल रेकॉर्डिंगची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सय्यद मतीनचा एक कार्यकर्ता आणि खासदार ओवेसी यांच्यात झालेल्या संभाषणाची ही ऑडिओ क्लिप आहे. भाजपच्या नगरसेवकांनी मतीनला केलेल्या मारहाणीची तक्रार करणाऱ्या या कार्यकर्त्याला खासदार ओवेसी यांनी चांगलेच झापल्याचे दोघांच्या संभाषणातून स्पष्ट होते. पक्षाला न सांगता नगरसेवक मतीन काहीही करतो. ते पक्ष शिस्तीच्या विरोधात असून, अशा कृतींना पाठीशी घातले जाणार नसल्याचे खासदार ओवेसी यांनी या कार्यकर्त्याला ठणकावून सांगितले.

माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन याने विरोध केला. वाजपेयी यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणे मतीनला महागात पडले. भाजपच्या सहा-सात नगरसेवकांनी सभागृहातच सय्यद मतीनला अक्षरशः तुडवला. त्याला चपलेचाही प्रसाद दिला. त्यानंतर निर्ढावलेल्या मतीनने एक एकाने यायचे होते, अशी प्रतिक्रिया देऊन आपल्यातील मस्तवालपणाचे दर्शन घडविले. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला मारहाण करणाऱ्या भाजपच्या सात नगरसेवकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सय्यद मतीनला मारहाण झाल्यानंतर त्याच्या सलमान नावाच्या एका कार्यकर्त्याने एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांना फोन करून त्यांच्याकडे एमआयएमच्या नगरसेवकांची तक्रार केली. भाजपचे नगरसेवक सय्यद मतीनला मारहाण करत असताना एमआयएमचे २२ नगरसेवक केवळ बघत राहिले. किमान त्यांनी विरोध तरी करायला हवा होता, असे त्या कार्यकर्त्याने खासदार ओवेसी यांना सांगितले. त्यानंतर खासदार ओवेसी संतापले आणि सलमान नावाच्या कार्यकर्त्याला फोनवरच सुनावले.

“मतीन पक्षाला न सांगता किंवा कोणालाही विश्वासात न घेता अनेक गोष्टी करतो. यापूर्वीही त्याने असे अनेक प्रकार केले आहेत. त्यावेळी आपण स्वतः त्याला समजावून सांगितले. हैदराबादमध्ये बोलावून त्याला २० ते २५ वेळा समजावले. परंतु, त्याच्यात काही सुधारणा होत नाही. पक्षाला काही शिस्त असते. तो करत असलेल्या गोष्टी पक्षाच्या शिस्तीत बसत नाहीत. त्यामुळे त्याने केलेल्या कृती पाठीशी घालता येत नाहीत, अशा शब्दांत खासदार ओवेसी यांनी सलमान नावाच्या कार्यकर्त्याला सुनावले. या दोघांमध्ये फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.