एफटीआयआयचे अध्यक्ष कुठे आहेत? – नसीरुद्दीन शहा

65

पुणे, दि. ३० (पीसीबी) –  एफटीआयआयचे अध्यक्ष कुठे आहेत? ते येथे येतात तरी केव्हा? ते जर येथे येतच नसतील तर मी त्यांच्या कामावर भाष्य कसे करायचे ? असा तिरकस सवाल  ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी केला.  

अनुपम खेर यांची ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थे’च्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती होऊन वर्ष पूर्ण झाले आहे. याबाबत पत्रकारांनी नसीरुद्दीन शहा यांना विचारले असता त्यांनी काहीशी तिरकस प्रतिक्रिया दिली. अनुपम खेर संस्थेत आलेले मी क्वचितच पाहिले आहे, मग त्यांच्या कामकाजावर मी प्रतिक्रिया कशी देऊ? ते संस्थेत फक्त दोनवेळा आले आहेत, असे नसरुद्दीन शहा म्हणाले.

मी एफटीआयआयमध्ये व्याख्यानासाठी अनेक वेळा  येत असतो. अनुपम खेर हे एफटीआयआयमध्ये फारसे येत नसल्याचे मला समजले आहे.  मी स्वत:ही त्यांना येथे क्वचितच बघितले आहे. अनुपम यांनी संस्थेला पुरेसा वेळ दिला तरच आम्हाला त्यांचे काम पाहायला मिळेल आणि त्यानंतरच त्यांच्या कामाबद्दल बोलता येईल’, असा खोचक  टोलाही नसरुद्दीन शहा यांनी लगावला.