एनीडेस्क सॉफ्टवेअर फोनमध्ये इन्स्टॉल करण्यास सांगत दीड लाखांची फसवणूक

51

पिंपरी दि. १६(पीसीबी) -व्होडाफोन कंपनीमधून व्हीआय कंपनीत सिमकार्ड ट्रान्सफर करायचे असल्याचे सांगून रिचार्जच्या बहाण्याने एनीडेस्क नावाचे सॉफ्टवेअर फोनमध्ये इन्स्टॉल करण्यास महिलेला भाग पाडले. त्यानंतर महिलेच्या बँक खात्यातून एक लाख 48 हजार 500 रुपये बिजय गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करत फसवणूक केली. ही घटना 6 जानेवारी रोजी रात्री घडली.

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8471034149 मोबाईल क्रमांक धारक आणि बिजय गुप्ता नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8471034149 या क्रमांकावरून बोलणा-या व्यक्तीने तो व्होडाफोन कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे फिर्यादीस सांगितले. फिर्यादी यांचे व्होडाफोन कंपनीचे सिमकार्ड व्हीआय या कंपनीत ट्रान्सफर करण्यासाठी दहा रुपयांचा रिचार्ज करण्यास फोनवरील व्यक्तीने सांगितले.

तसेच फिर्यादी यांच्या मोबाईल फोनवर एनीडेस्क नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असता फोनवरील व्यक्तीने फिर्यादी यांच्या मोबाईल फोनमधील बँक खात्याचा तपशील घेऊन दोन व्यवहार करत त्यांच्या खात्यातून एक लाख 48 हजार 500 रुपये बिजय गुप्ता नावाच्या बँक खातेधारकाच्या खात्यावर ट्रान्सफर करत फिर्यादीची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने तपास करीत आहेत