एक शरद बाकी गारद नव्हे`,`एक नारद बाकी गारद` म्हणा…– देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांवर निशाणा

16

नाशिक, दि. ९ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल द्यायला हवं होतं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ‘बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल फडणवीसांनी विचारला. सलग दुसऱ्या दिवशी भाजप-शिवसेना यांच्यात ‘सामना’ सुरुच आहे.

‘सामना’ किती जण वाचतात? माध्यमांना आयती बातमी मिळते, म्हणून ‘सामना’ला तुम्ही प्रसिद्धी देता. ‘सामना’मध्ये कोरोनाबाबत एकही अग्रलेख नाही.’ असे फडणवीस म्हणाले. नाशिक दौऱ्यात ते माध्यमांशी बोलत होते.

एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल मुलाखतीला द्यायला हवं होतं, असं म्हणत ‘सामना’ हे शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याची खोचक टीका फडणवीसांनी केली. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

“राज्यात मास टेस्टिंग महत्वाचे आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी नंबर गेम खेळण्यात व्यस्त आहे. आकडे कमी दाखवण्यासाठी मुंबईकरांना सरकार अडचणीत आणत आहे” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सरकारने अग्रेसिव्ह टेस्ट मोफत करणं गरजेचं आहे. मुंबईचा इन्फेक्शन रेशो देशात सर्वाधिक आहे. खाजगी हॉस्पिटल सरकारच्या जीआरचा गैरफायदा घेत लूट करत आहेत, असा दावा त्यांनी केला. खाजगी शाळांनी फी वाढवणे चुकीचे आहे. सध्या तरी ऑनलाइन शिक्षण देऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

सामना’ची भूमिका रोज बदलते, ती कधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात असते, कधी बाजूने असते. कधी राज्यपालांच्या बाजूने असते, तर कधी विरोधात असते. त्यांना स्वतःचा बेसच नाही. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे. भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता.

WhatsAppShare