एक राज्यमंत्रीपद  तीन कार्यकर्त्यांना प्रत्येकी सहा महिन्यासाठी देणार – रामदास आठवले  

1116

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – राज्यातील मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला एक राज्यमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली आहे. राज्य सरकारचा आता केवळ दीड वर्षांचा कार्यकाल शिल्लक राहिला आहे. त्यामुळे रिपाइंला मिळणारे मंत्रिपद सहा- सहा महिन्यांसाठी तीन कार्यकर्त्याना वाटून देण्यात येईल, असे  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.  

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  बोलताना आठवले म्हणाले की,   रिपब्लिकन पक्षाला एकही विधानपरिषद सदस्यत्व देण्यात आलेले  नाही. त्यामुळे रिपाइंच्या कार्यकर्त्याला राज्यमंत्रीपद  दिल्यानंतर त्यास ६ महिन्यांच्या कालावधीत विधिमंडळाचे सदस्यत्व द्यावे लागणार आहे.  ते न दिल्यास आपोआप राज्यमंत्रीपद त्यास सोडावे लागेल. त्यामुळे विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य नसले तरी रिपाइंचा कार्यकर्ता ६ महिन्यांसाठी राज्यमंत्री होऊ शकतो.

त्यामुळे सहा महिन्यांचे राज्यमंत्रीपद प्रत्येक कार्यकर्त्याला देऊन दीड वर्षांच्या कालावधीत   ३ कार्यकर्त्यांना प्रत्येकी ६ महिन्यांसाठी राज्यमंत्रीपद उपभोगता  येईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.