एक दिवसासाठी भाजप नेते व्हा, कशी कसरत करावी लागते, ते समजेल – चंद्रकांतदादा

232

सिंधुदुर्ग, दि. ८ (पीसीबी) – एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते, ते समजेल, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. चंद्रकांतदादा आज (शनिवार) सिंधुदुर्गात बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, शेट्टी या सगळ्याचा समतोल करत कसे पुढे जायचे हे लक्षात येईल. मात्र, यशस्वीपणे समतोल साधत आम्ही चार वर्ष पूर्ण केली आहेत. एक वर्षही पूर्ण होईल. पुन्हा निवडणूक जिंकू, पुन्हा शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, सदाभाऊ खोत, परत आले तर शेट्टीसाहेब सगळे एकत्र येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सलग चार वर्षांमधील युतीबाबतच्या माझ्या पत्रकार परिषदा पाहिल्या, तर कधीही एका वाक्याने सुद्धा युतीबाबत साशंक नाही. मी नेहमीच म्हणतो युती होईल. हे चार वेळा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाहिले आहे. त्यापैकी एक म्हणजे राज्यसभेच्या उपसभपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने मतदान केले होते, याची आठवण चंद्रकांत पाटील यांनी करून दिली.