एक कोटी दहा लाखांची व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या दोघांना अटक..

133

मोशी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने व्हेल माशाची एक कोटी 10 लाख रुपये किमतीची उलटी पकडली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे ही उलटी दोघांनी मोशी येथे विक्रीसाठी एकाला कुरियरने पाठवली होती. ही कारवाई सोमवारी (दि. 6) सकाळी मोशी टोलनाका येथे करण्यात आली.

जॉन सुनील साठे (वय 33, रा. मगरमळा, नाशिक रोड), अजित हुकूमचंद बागमार (वय 61, रा. कारंजा नाशिक), मनोज अली (रा. भिवंडी नाशिकफाटा पिंजारवाडी) यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2 (16) (सी) 9, 39, 44, 48 (अ), 49 (ब), 57, 51 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील जॉन आणि अजित या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रमोद गर्जे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित आणि मनोज या दोघांनी आरोपी जॉन याला कुरियरने व्हेल माशाची उलटी पाठवली. जॉन पिंपरी चिंचवड शहरात ही उलटी बेकायदेशीरपणे विकणार होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकला याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी मोशी टोलनाका येथे सापळा लावून जॉन याला ताब्यात घेतले.

आरोपींकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी 10 लाख रुपये किमतीची व्हेल माशाची 550 ग्रॅम उलटी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.ठाण्यात शिवसेनेनं काहीही काम केलेलं नाही – मनसे