एकेकाळी दोन खासदार असलेला भाजप सत्ता मिळवतो, तुम्हीदेखील सत्तेत येऊ शकता – शेख हसीना

976

ढाका, दि. १ (पीसीबी) – विरोधकांनी भारताकडे पाहावे. गत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या? निवडणूक होईपर्यंत त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करता आला नाही. भारतामधील इतका जुना पक्ष असूनही त्यांना स्वत:चा नेता निवडता आला नाही. त्यामुळेच जनतेने काँग्रेसला नाकारले.  दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात भाजपचे अवघे दोन खासदार जिंकून आले होते. आज तोच पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे विरोधकांनी चांगले काम केल्यास एक दिवस ते सत्तेत येतील, असे  बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे.    

बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या शेख हसीना यांनी त्यांच्या निवासस्थांनी पत्रकार परिषद घेतली.  यावेळी त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवताना भाजप आणि काँग्रेस पक्षाचे उदाहरण दिले.

शेख हसिना यांच्या अवामी लीगप्रणित आघाडीने २८८ जागांवर विजय मिळवला. तर बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाच्या (बीएनपी) नेतृत्वाखाली विरोधकांना अवघ्या ७ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कमी जागा मिळाल्याने विरोधकांवर हसीना यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून शेख हसीना यांनी अनेक विरोधकांना तुरुंगात टाकले होते. यामुळे  धुसफूस निर्माण झाली होती. निवडणुकीच्या काळात झालेल्या हिंसाचारात देशभरात १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत विरोधक शेख हसीना यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करतील, असे वाटत होते. मात्र, विरोधक निष्प्रभ ठरले.

 

WhatsAppShare