एकाच धाग्यातून साकारला तिरंगा; स्वप्नपूर्तीसाठी त्याने विकले घर!

89

हैदराबाद, दि. १६ (पीसीबी) – कोणत्याही शिवणकामाशिवाय तसेच कापडाच्या जोडणीशिवाय एकाच धाग्यातून भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्यात आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने यश मिळवले आहे. आजवर कुणीही न केलेले हे काम करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या व्यक्तीला मात्र अनेक खडतर आव्हानांचा सामना करावा लागला, यासाठी त्याला आपले वडिलोपार्जित घरही विकावे लागले.

आर. सत्यनारायण असे या हातमाग कारागिराचे नाव असून एकाच धाग्यात तिरंगा बनवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला साडे सहा लाख रुपयांची गरज भासणार होती. काहीही करुन हे स्वप्न पूर्ण करण्याचा त्याने चंगच बांधला, त्यासाठी त्याने आपले वडिलोपार्जित घर विकून टाकले आणि पैसे जमवले.

सत्यनारायणने ८ फूट बाय १२ फूट या आकारात तिरंगा साकारण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्याचा दावा आहे की, अशा प्रकारे केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगासह निळ्या रंगातील अशोक चक्र असा तिरंगा खादीच्या एकाच धाग्यांपासून आजवर तयार करण्यात आलेला नाही. तिरंगा तयार करताना तिनही रंगांचे भाग निश्चित मापांमध्ये जोडूनच किंबहुना शिवूनच ते तयार केले जातात.