एकाच कुटूंबातील चौघांची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी मात्र चिमुकलीला दिले जीवदान

622

लखनौ, दि. ७ (पीसीबी) – अलाहाबादमधील सोरांव येथे एकाच कुटुंबातील चार जणांची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (शुक्रवार) उघडकीस आली. मारेकऱ्यांनी मात्र त्या कुटूंबातील चिमुकलीला जीवदान दिले आहे.

प्रताप सिंह, त्यांची पत्नी किरण, सात वर्षांचा मुलगा विराट आणि किरण यांच्या आई कमलेश देवी असे हत्या झालेल्या एकाच कुटूंबातील चौघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रताप सिंह यांच्या शेजाऱ्यांना आज सकाळी त्यांची एक वर्षाच्या चिमुकलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. मुलगी का रडत आहे, याची विचारपूस करण्यासाठी शेजाऱ्यांनी अनेक वेळा प्रताप सिंह यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर शेवटी त्यांनी आपल्या मुलाला प्रताप सिंह यांच्या घरी पाठवले.  त्यांच्या घरी दाखल होताच मुलाला धक्काच बसला. कारण लहान मुलीव्यतिरिक्त सर्व जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तातडीने घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. प्रताप सिंह यांचे कोणासोबतही वाद नव्हते. मग सिंह कुटुंबीयांची हत्या का करण्यात आली, याचा शोध पोलीस घेत आहेत.