एकाच कुटुंबातील चार मुलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

41

जळगाव, दि. १६ (पीसीबी) – जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एकाच कुटुंबातील चार मुलांची हत्या झाल्यााने खळबळ उडाली आहे. चारही चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुलांची हत्या झाली तेव्हा त्यांचे आई-वडील घरात नव्हते. शेतमालकाला मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलीस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्‍तुफा यांच्या शेतात महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य सालदार म्हणून राहतं. दांपत्या मध्य प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेलं होतं. यावेली घरात मुलं एकटी होती. सईता (१२), रावल (११), अनिल (८) आणि सुमन (३) अशी या मुलांची नावं आहेत. शेतमालकाला सकाळी मुलांची हत्या झाल्याचं आढळलं आणि एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

पाच वर्षापूर्वी जळगाव शहराजवळील भादली गावात एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या घडली होती. अद्यापर्यंत या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना अपयश आलं आहे. त्यात आजदेखील अशाच प्रकारे झालेल्या हत्याकांडामुळे भादली हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे.

WhatsAppShare