एकनाथ शिंदे – प्रताप सरनाईक यांच्यात फोनवर चकमक

70

ठाणे, दि. ३० (पीसीबी) – ठाण्यामधील एका मतदारसंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये किरकोळ मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे. असं असतानाच आता सरनाईक यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक या दोन्ही नेत्यांचे फोटो आहेत. या फोटोची कॅप्शन सध्या चर्चेत असून या फोटोच्या माध्यमातून पूर्वेश यांनी सूचक विधान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे.

‘दो दिल और एक जान है हम’ अशा कॅप्शनसहीत पूर्वेश यांनी शिंदे आणि सरनाईक यांचे फोटो ट्वीट केले आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांवर पूर्वेश यांनी दोन्ही नेत्यांमधील मतभेदाचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. तर सरनाईक यांनी मात्र या मतभेदाच्या प्रश्नावर प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ठाणे जिल्ह्यामधील शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये या दोघांच्या नावाचा समावेश होतो. सरनाईक हे शिंदे समर्थक बंडखोर आमदारांपैकी एक आहेत.

शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. तर सरनाईक हे ओवळा माजिवाडा मतदार संघाचे आमदार आहेत. आमदारकीचा प्रभाग कोणी सोडावा यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून याबद्दलच्या बातम्याची प्रसिद्ध झाल्या आहेत. दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेचे आहेत. मात्र हा मतदारसंघ सरनाईक यांनी भाजपासाठी सोडावा असं शिंदे यांचं मत असल्याच्या बातम्या समोर आल्या.

शिंदे यांच्या म्हणण्यानुसार हा आपला पारंपारिक मतदारसंघ सोडण्यास सरनाईक तयार नसल्याचंही वृत्तात म्हटलं होतं. मात्र ही बातमी खोटी असल्याचं पूर्वेश यांचं म्हणणं आहे. आपलं हेच म्हणण पूर्वेश यांनी ट्वीटरवरुन मांडलं आहे. पूर्वेश यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोन्ही नेत्यांचे ट्वीटर हॅण्डलही टॅग केलेत.