एकनाथ खडसेंना पंतप्रधानही व्हावेसे वाटत असावे; गिरीश महाजनांचा उपरोधिक टोला  

397

नाशिक, दि. ५ (पीसीबी) – एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते असून ते मंत्री होते. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छा, अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असू शकते, त्यांना पंतप्रधानही व्हावेसे वाटत असावे. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेत असतात, हे विसरता येत नये, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या विधानावर दिली.   

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज (रविवार) गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी ते  पत्रकारांशी बोलत होते.

ज्येष्ठत्वानुसार मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते, असे विधान एकनाथ खडसे यांनी भुसावळ येथील एका कार्यक्रमात केले होते. यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले की, याबाबत मी देखील वर्तमानपत्रात वाचले आहे. खडसे साहेब आमचे नेते असून ते पक्षात ज्येष्ठ आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी चांगल्या पध्दतीने काम केले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, असे वाटणे साहजिक आहे. इतकेच नाही तर त्यांना पंतप्रधान देखील व्हावेसे वाटत असेल.

मात्र, अंतिम निर्णय हा पक्षच घेत असतो, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे महाजन म्हणाले.  केंद्रात देखील अनेक ज्येष्ठ नेते मंत्री आहेत. केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत अनेक ज्येष्ठ नेते असतात. मात्र, त्यांना संधी मिळेलच असे सांगता नाही. त्यामुळे त्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे, असे महाजन म्हणाले.