ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडताना चोरट्याला रंगेहाथ पकडले

150

निगडी, दि. ६ (पीसीबी) – आकुर्डी येथील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडताना एका चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री सव्वाएक वाजता राजू मिसाळ यांच्या कार्यालयासमोर असलेल्या ऍक्सिस बँकेच्या एटीएम मध्ये घडली.

सनी आनंदा धस (वय 23, रा. ऐरोली, नवी मुंबई) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुनील जाधव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे सहकारी पोलीस शिपाई अमित वाघमारे शनिवारी मध्यरात्री रात्रपाळी बिट मार्शल ड्युटी करत होते. ते आकुर्डी येथून गस्त घालत असताना त्यांना ऍक्सिस बँकेच्या एटीएम समोर एक तरुण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपी सनी याला ताब्यात घेतले.

सनीकडे एक लोखंडी पटाशी, प्लास्टिक ब्लेड कटर, पेपर स्प्रे, लोखंडी पाना, लोखंडी वायर कटर, कात्री, नायलॉन रस्सी, मोबाईल फोन, स्क्रू ड्रायव्हर असा ऐवज मिळून आला. पोलिसांनी हा ऐवज आणि त्याची दुचाकी जप्त करत त्याला अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.