उसने पैसे देण्यास नकार दिला म्हणून डोक्यात घातला लोखंडी रॉड

1

हिंंजवडी, दि. २३ (पीसीबी) – उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाला लोखंडी रॉडने डोक्यात मारून, कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. यामध्ये हल्ला झालेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी माण रोडवर आणि देवकरवाडी घोटवडे येथे घडली असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

विशाल प्रकाश देवकर (वय 26, रा. देवकरवाडी घोटवडे, ता. मुळशी) असे खुनी हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी (दि. 22) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विकास संभाजी तनपुरे, सागर संभाजी नलावडे (दोघे रा. वाकड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींसह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. विशाल आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता विशाल आणि आरोपी माण रोडवरील बापूजीबुवा घाटातील विठ्ठल मंदिरासमोर भेटले. आरोपी विकास याने विशाल यांच्याकडे उसने पैसे मागितले. ते देण्यासाठी विशाल यांनी नकार दिला.

या कारणावरून आरोपींनी विशाल यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. विकास आणि सागर या दोघांनी विशाल यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर विशाल यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्यासारख्या हत्याराने पायावर वार केले.

त्यानंतर विशाल त्यांच्या घरी गेले. आरोपी विशाल यांच्या मागे जाऊन जबरदस्तीने घरात घुसले. घरातील कपाट तोडले. घराबाहेर पार्क केलेली स्विफ्ट कार आणि मोपेड दुचाकीचे नुकसान केले. विशाल यांनी याबाबत मंगळवारी पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare